“मानसिक आरोग्य फार मोलाचे आहे. मनोविकारांच्या रुग्णांना योग्य उपचार मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मराठवाड्यासारख्या  दुर्लक्षित भागातील मनोरुग्णांना शक्य असतील ते उत्कृष्ट उपचार देता यावेत ही आमची प्रांजळ धडपड व भावनिक बांधिलकी आहे असे आम्ही मानतो.”

ह्या उत्कट अशा कर्तव्यभावनेतून २७ ऑक्टोबर १९७९ ह्या दिवशी औरंगाबादमधील खडकेश्वर येथे एका साध्या दवाखान्याच्या रुपात आजच्या ‘शांती नर्सिंग होम’चे रोपटे अस्तित्वात आले. त्या काळात मनोरुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांची निकड या भागातील फार कमी लोकांना पटलेली होती. काळाच्या ओघात या उपचारांची आवश्यकता सर्वाना पटू लागली. पुढे ‘शांती नर्सिंग होम’ अस्तित्वात आले. आणि नंतर तर महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट खाजगी मानसिक शुश्रुषागृह’ हा पुरस्कार देऊन आमच्या या प्रयत्नांचा आणि सेवेचा उचित गौरव केला.

मनोविकार चिकित्सेच्या क्षेत्रात समाजमनात मनोविकारांबद्द्ल समज व जाणीव निर्माण होणे हे फार महत्वाचे असते. मनोविकाराचे निश्चित निदान करणे आणि त्यावर योग्यवेळी योग्य ते उपचार करणे अत्यावश्यक असते. परंतु उपचारांमध्ये सातत्य नसेल तर हे उपचार निष्फळ ठरतात. या समस्यांवर आम्ही मात करू शकलो ते केवळ डॉ. विनायक पाटील यांच्या अथक व समर्पण भावनेने केलेल्या प्रयत्नांमुळेच. १९८२ मध्ये डॉ. पाटील यांचे आमच्या या सेवाभावी प्रयत्नांमध्ये सहभागी होणे हा आमच्या प्रदीर्घ प्रवासातील मैलाचा दगड आहे.

१९८६ मध्ये कांचनवाडी ह्या खेड्याजवळील आमच्या स्वतःच्या विस्तीर्ण परिसरात आम्ही स्थानांतरित झालो, आणि ‘शांती नर्सिंग होम’ कार्यरत झाले. खडकेश्वर येथील क्लिनिकपासून शांती नर्सिंग होम (आन्तररुग्ण विभाग) सात किलोमीटर्स दूर असल्यामुळे त्या काळात हे अंतर खूप वाटायचे. नेमक्या याच सुमारास डॉ. पाटील यांना उच्चशिक्षणासाठी मुंबईला जावे लागले. एकमेकांपासून इतक्या दूर असणाऱ्या क्लिनिक व आन्तररुग्ण विभाग या दोन्ही आघाड्यांवरील जबाबदाऱ्या मी एकटा कसा सांभाळणार? या सुमारास माझी आणि सौ. शैला सुभाष वैद्य यांची केवळ योगायोगाने भेट झाली. मानसशास्त्राचे उत्तम ज्ञान असलेल्या शैला वैद्य त्यावेळी मराठवाड्यातील एकमेव ऑक्युपेशनल थेरपिस्ट होत्या आणि ‘रांची मेंटल हॉस्पिटल’ मधील समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी होता. आमच्या कार्यात त्या आनंदाने सहभागी झाल्या. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच आम्ही ‘शांती नर्सिंग होम’ मधील कामाचा दर्जा व सातत्य टिकवू शकलो. त्यांचे सहकार्य आम्हाला लाभणे हा आमच्या रुग्णालयाच्या वाटचालीतील दुसरा महत्वाचा टप्पा होता.

आमच्या रुग्णालयातील कामाचा व जबाबदाऱ्यांचा व्याप वेगाने वाढत होता आणि त्या वेगाशी जुळवून घेण्यात आमची दमछाक होत होती. अशा बिकट परिस्थितीत स्वतःची गायनोकोलोजिची रुळलेली प्रेक्टीस पूर्णपणे सोडून देऊन १९८९ मध्ये डॉ. सौ. अनुराधा बाऱ्हाळे मदतीला धावून आल्या. त्यांच्या येण्यामुळे ‘शांती नर्सिंग होम’ मधील रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणि रुग्णालयाचा लौकिक आणखी उंचावला. ‘शांती नर्सिंग होम’च्या झपाट्याने होणाऱ्या विकासातील हा तिसरा महत्वाचा टप्पा होता.

श्री विजय नांदापूरकर यांनी रुग्णालयाच्या फार्मसीची अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड जबाबदारी अंगावर घेऊन समर्थपणे सांभाळली म्हणूनच आम्ही आमच्या कामावर शांतपणे लक्ष केंद्रित करू शकलो. मेहनत, चिकाटी व जीव ओतून वेळोवेळी आपलेपणाने मदत करण्याच्या स्वभावामुळे हळूहळू तेही शांती नर्सिंग होम कुटुंबाचा महत्वाचा घटक बनले.

सायकियाट्रि अर्थात मनोविकार चिकित्सा ही वैद्यकीय शाखा त्यावेळी मराठवाड्याला तुलनेने अत्यंत कमी परिचित होती. या उपचार पद्धतीत ईसीटीसाठी अनेस्थेटिस्टची फार आवश्यकता असते. त्या काळात खूप कमी अनेस्थेटिस्टस उपलब्ध होते. परंतु केवळ माझ्या साध्या विनंतीवरून अनेस्थेटिस्ट म्हणून मोठा लौकिक असलेले डॉ. प्रमोद लाळे यांनी मदतीस यायला सुरुवात केली. त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. जगदीश कंडी व डॉ. दिलीप देशमुख हे दोघे जबाबदारी सांभाळीत असत. या दोघांच्याही मदतीचे मोल मोठे आहे. १९८५ पासून डॉ. संजीव देशपांडे हे नियमित अनेस्थेटिस्ट म्हणून आमच्याकडे येऊ लागले. डॉ. संजीव देशपांडे यांचे शिकण्यावर आणि शिकविण्यावर मनस्वी प्रेम आहे.  डॉ. संजीव देशपांडे आणि डॉ. विनायक पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच या विभागाला आजचे वैभव लाभले आहे. डॉ. माणिक देशपांडे हे अनेस्थेटिस्ट देखील आमच्या कार्यात सहभागी झाले आहेत.

या सर्व मित्रांच्या कष्टांमुळेच आमच्या रुग्णालयीन कार्याची वाट सुरळीत व सुकर झाली आहे. आणि हे सर्व मित्र आपआपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत. म्हणूनच इतर विभागांच्या विकास सोपा झाला. या सर्व मित्रांचे अथक परिश्रम आणि समर्पित वृत्ती यांची परिणिती महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्य मंत्री मा. दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते आम्हाला प्रदान करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील उत्कृष्ट खाजगी मानसिक शुश्रुषागृह’ या पुरस्कारात झाली.

 आमच्या या कार्यात आता दुसरी पिढी देखील सामील झाली आहे. . अधिक उत्साहाने. . नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या चैतन्याने. . आम्ही व्रतस्थ वृत्तीने स्वीकारलेल्या या अवघड कार्यातील अविरत आणि अर्थपूर्ण सातत्याची ही नांदी आहे. .

- डॉ. विनय बाऱ्हाळे