प्र. १ : डॉक्टर, तुमच्याकडे रुग्णाला कसे आणणार? आम्ही तुमच्याकडे आलो हे लोकांना कळाले तर?

- आजार लपवल्याने तो कमी होत नाही. वाढलेली लक्षणे दिसतातच, लोकांच्या लक्षात येणारच. शिवाय, लपवल्यामुळे, इलाज न केल्यामुळे, वाढणारा त्रास आणि नुकसान फार मोठ्या प्रमाणात (मानसिक आजारात) होते.

मानसिक आजारामुळे होणारा त्रास आणि नुकसान टाळण्यासाठी लोकांना न भिता त्वरित इलाज करा. कदाचित माझ्याकडे आल्याचे लोकांना कळेल, पण रुग्ण पूर्ववत झाला, सुधारला तर लोकच म्हणतील, आता याचे वागणे, कार्यक्षमता एकदम छान आहे.

आधी तुम्ही हे समजून घ्या की मानसिक आजार हा एक आजार आहे. त्यात कमीपणा काहीच नाही. लोकांकडून सकारात्मक दृष्टीकोनाची तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही आधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. अनुभव असा आहे की, सकारत्मक दृष्टीकोन ठेऊन इलाजास त्वरित येणाऱ्याना फायदा होतो. एवढेच नाही तर आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर समजाचा दृष्टीकोन पण सकारात्मक होतो.

प्र. २ : तुम्ही वेड्याचे डॉक्टर आहात, मी वेडा आहे का?

- हे बघा मी मानसोपचार तज्ञ आहे. वेड लागणे किंवा विचित्र वागणे हे फार थोड्या मानसिक आजाराचे लक्षण आहे. बहुतेक मानसिक आजारात रुग्णाची वर्तणूक ही सामान्यच असते, विचित्र नसतेच. आता हेच बघा, बाहेर ओपीडीत ६० ते ७० रुग्ण बसले आहेत. त्यातील एक तरी तुम्हाला वेडा दिसतो का? नाही ना! तेच मी तुम्हाला म्हणतोय, वेड लागणे हे फार थोड्या मानसिक आजारात दिसणारे लक्षण आहे. त्याचा मी इलाज करतो म्हणून मी काही वेड्यांचाच डॉक्टर नाही तर मी मनाच्या आजाराचा डॉक्टर आहे, मानसरोग तज्ञ.

तुमची ही वागणुक सामान्य आहे, पण तुम्ही ज्या लक्षणांमुळे त्रासलेले आहात ती मानसिक आजाराची लक्षणे आहेत. तुम्ही नीट इलाज करून घेतलात तर बरे होणार, ३-४ आठवड्यातच मी काय म्हणतो हे तुम्हाला पटेल.

तर तुम्ही वेडे नाहीत तुम्हाला मानसिक आजार आहे. माझे म्हणणे समजून घ्या तुम्ही बरे व्हाल.

प्र. ३ : आपल्याला मानसरोग तज्ञाकडे आणले आहे हे लक्षात आल्यावर रुग्णाच्या मनावर वाईट परिणाम होईल का?

- नाही होणार असे माझा ३४ वर्षाचा अनुभव सांगतो. सुरुवातीस भीती आणि कमीपणाची भावना त्याच्या मनात येईल ही, पण इलाजा दरम्यान त्याच्या हे लक्षात येईल की मानसिक आजार हा एक आजार आहे, तो काही मनाचा कमकुवतपणा नाही आणि त्यावर उत्तम उपचार आहेत. या गोष्टी ध्यानात आल्या कि रुग्णाचा तुम्ही म्हणता तसा माझ्याकडे येण्याचा दृष्टीकोन राहणार नाही. एक सकारात्मक दृष्टीकोन आजारासंबंधी व इलाज करणाऱ्या संबंधी निर्माण होईल.

प्र. ४ : डॉक्टर तुमच्याकडे मला आमच्या फमिलि डॉक्टरांनी वर्षापूर्वीच पाठवले पण तुमच्याकडे येण्याची भीती वाटली. कारण तुम्ही शॉक देता असे समजले. मला शॉक देणार का?

- तुमच्या आजाराचा आढावा घेऊन मी तुम्हाला तपासले. तुम्हाला चिंता रोग आहे. त्यास Generalized Anxiety Disorder म्हणतात. या आजारात शॉक ट्रिटमेंट देत नाहीत.

फार थोड्या मानसिक आजारात ही ट्रिटमेंट वापरतात. या ट्रिटमेंटला लोक कल्पनेनेच भितात. ज्यांनी ही ट्रिटमेंट घेतली आहे. त्यांना तर ही ट्रिटमेंट चांगली वाटते.

प्र. ५ : मानसिक आजाराचे सर्टिफिकेट घेतल्यास त्याचा नोकरीवर वाईट परिणाम होईल का?

- मानसिक तज्ञाच्या सर्टिफिकेटमुळे नोकरी जाईल, प्रमोशन मिळणार नाही, अशी चुकीची भीती अनेकांच्या मनात असते. पण मानसिक आजाराच्या सर्टिफिकेटमुळे नुकसान होत नाही. तुम्ही कार्यक्षम आहात आणि तुमचा आजार बरा आहे असे सर्टिफिकेट मानसरोग तज्ञाने दिल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

सर्टिफिकेटवर आजाराची व रुग्णाच्या कार्यक्षमतेची योग्य व खरी माहीती असणे अवश्य आहे. खोटी माहीती पुरवणे हा गुन्हा आहे.

प्र. ६ : डॉक्टर गेली ५ वर्षे मी अनेकांकडे इलाज केला, शेवटी डॉक्टर म्हणाले हे मानसिक आहे. मला भुक लागत नाही, अशक्तपणा आलाय, पोट दुखते. घरी किंवा ऑफिसमध्ये कोणताही ताण नाही मग हे मानसिक आहे हे म्हणणे बरोबर आहे का?

- शारीरिक लक्षणे म्हणजे शारिरीक आजार नाही. बहुतेक वेळा शारीरिक लक्षणे ही मानसिक आजारामुळे निर्माण होतात. ६० टक्के वेळा शारिरीक लक्षणे ही मानसिक आजारामुळे असतात आणि मानसिक आजाराचे योग्य निदान करून इलाज केल्यास ही लक्षणे कमी होतात.

तुम्हाला तपासल्यानंतर माझी खात्री झाली आहे की, तुम्हाला असलेली शारीरिक लक्षणे ही नैराश्य (Depression) नावाच्या मानसिक आजाराची आहेत आणि ही मानसिक उपचाराने बरी होतील.

मानसिक आजार होण्यासाठी ताण असणे आवश्यक आहे असे नाही.

तुम्ही मानसोपचार सुरु करा तुम्हाला २-३ आठवड्यात लक्षात येईल मी काय म्हणतोय ते.

प्र. ७ : तुम्ही झोपेच्या गोळ्या देता, तुमच्या गोळ्यामुळे वजन वाढते, सुस्ती येते मग काय झोपूनच राहायचे का?

- कोणत्याही इलाजामागे हेतू असतो, रुग्णाचा आजार कमी करून त्याची कार्यक्षमता वाढवणे. तसेच मानसिक आजाराच्या इलाजाचा हेतू देखील आजार कमी करणे व कार्यक्षमता वाढवणे असा आहे. मग झोपेच्या गोळ्या देऊन रुग्णाला झोपून कसं ठेवणार. पण हे खरं आहे की मानसिक आजाराच्या प्रकाराप्रमाणे गोळ्या योग्य प्रमाणात देऊन ही काही रुग्णांमध्ये काही वेळा वरील साईड इफेक्ट येतात. अशा वेळी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टराना जर ही माहिती दिली तर गोळ्यात बदल करता येतो किंवा चालू असलेल्या गोळ्यांच्या डोसमध्ये फरक करता येतो. मानसिक आजाराच्या इलाजात झोपेच्या गोळ्या देतात, हा चुकीचा समज आहे.

प्र. ८ : रुग्ण हॉस्पीटलमध्ये येण्यास तयार नाही. काय करावे?

- शारीरिक आजारात रुग्णाला असलेल्या त्रासाची, आजाराची जाण असते आणि या जाणीवेमुळे रुग्ण इलाजासाठी स्वतः होऊन डॉक्टरकडे जातो.

मानसिक आजारात ही जाण नसते (फक्त काही मानसिक आजारात). म्हणजे स्वतःच्या आजाराची, लक्षणांची जाण नसणे हे मानसिक आजाराचे लक्षण असते. योग्य इलाज केल्यास हे लक्षणं कमी होऊन रुग्णाला त्याच्या आजाराची जाण येते व मग तो स्वतः होऊन डॉक्टरकडे जातो.

म्हणजे असे, जाण निर्माण व्हावी यासाठी इलाज आवश्यक पण जाण नसल्यामुळे रुग्ण डॉक्टरकडे येत नाही. मग उपाय काय?

मानसिक आजारात रुग्णास आपण आजारी आहोत ही जाण नसल्याची तीव्रता खालील प्रमाणे असते.

१. रुग्णाला आजाराची चांगली जाण असणे.

२. रुग्णाला आजाराची अर्धवट जाण असणे.

३. रुग्णाला आजाराची मुळीच जाण नसणे.

१. जाण असणाऱ्या रुग्णाला थोडक्यात समजावून डॉक्टरकडे आणता येते. त्यांना जाण असते पण मानसरोग तज्ञांकडे जाण्याची भीती असते, गैरसमजुती असतात. आजारा बद्दल कमी पणाची भावना (Stigma) असते. त्यांना योग्य व्यक्तीकडून समजावून सांगून मानसरोग तज्ञाकडे आणता येते.

२. अर्धवट जाण असणाऱ्यास आणणे थोडे अवघड काम आहे. त्यांना असलेल्या शारिरीक लक्षणांवर बोट ठेऊन युक्तीने, योग्य व व्यवस्थित समजावून डॉक्टरकडे नेता येते. एकदा ट्रिटमेंट सुरु झाली की त्यास जाण लवकर येते व तो इलाजास येतो.

३. तिसऱ्या प्रकारात असणाऱ्या रुग्णांना समजावून सांगून दवाखान्यात आणणे जवळपास अशक्यच. त्यांना एकतर जबरदस्तीने आणावे लागते किंवा फारच युक्तीने आणून मग जबरदस्तीने इलाज करावा लागतो.

इलाज योग्य प्रकारे लागू पडल्यास जाण नसणे हे लक्षण बरे होते व त्यांनापण जाण येते व मग ते स्वतः होऊन ट्रिटमेंटला तयार होतात. पण सुरुवातीची जबरदस्ती महत्वाची ठरते.