“दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे.” – (जागतिक आरोग्य संघटना)

दारूच्या आहारी गेलेला माणूस हा वाईट माणूस नाही तर आजारी आहे हे लक्षात येणे महत्वाचे आहे हे लक्षात आले तरच उपचारासाठी रुग्ण म्हणून त्यास दवाखान्यात आणले जाईल. सुरुवात जरी मौज म्हणून झाली तरी नंतर १० टक्के लोकांमध्ये ती शरीर आणि मनाची गरज बनते. दारू पिण्यासाठी प्रत्येकाची सुरुवात होण्याचे कारण वेगळे असेल, व्यक्ती म्हणून तो वेगळा असेल पण प्रत्येकाच्या अध:पतनाची कहाणी मात्र जवळपास सारखीच असते.

दारूचे व्यसन हा एक जुनाट आजार आहे. पिण्यावर नियंत्रण नसणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि कायद्याचे त्रास हे दारू सेवानामुळे होणारे परिणाम आहेत. (व्याख्या : नैशनल कौन्सिल ऑन अल्कोहोलिझम, अमेरिका – १९९२).

शांती नर्सिंग होमच्या सुरुवातीपासून (१९७९) या आजाराचा उपचार सुरु होताच, पण या आजाराच्या कारणांची, परिणामांची व उपचाराची व्याप्ती लक्षात घेऊन मित्र ग्रुप आणि व्यसनमुक्ती विभागाची सुरुवात झाली ती १६ नोव्हेंबर २००१ रोजी. या विभागाचे प्रमुख आहेत डॉ. विनायक पाटील आणि त्यांच्या बरोबरीने काम करण्यासाठी सायकियाट्रिक सोशल वर्कर, क्लिनिकल सायकोलोजिस्ट व मेडिकल ऑफिसर आहेत.

  • मित्रग्रुपव्यसन ह्या मानसिक आजारात ग्रुप थेरपीचे महत्व लक्षात घेऊन सुरु केलेला हा ग्रुप आहे. दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मद्यपि रुग्णांसाठी चर्चासत्र आयोजित केले जाते. अनुभवकथन, मार्गदर्शन तसेच व्यसनमुक्तीसंबंधी वेगवेगळ्या विषयावर चर्चा या ग्रुपमध्ये होते. या ग्रुपसाठी डॉ. पाटील यांनी एक कविता लिहिली. ती अशी:

यारे यारे सारे या

आज ठरवूया

व्यसनाला या दूर पळवूया ||

दारू, गांजा, तंबाखू

हे तर अपुले महान शत्रु

शत्रु संगे युध्द लढूया

व्यसनाला या दूर पळवूया ||

मित्रासंगे सवय लागली

सवय कसली, झालो व्यसनी

आता आली नशिबी गुलामी

गुलामीला या दूर करूया ||

आपण अपुले भाग्य विधाते

भविष्य अपुले अपुल्या हाती

भविष्यास या उज्वल करूया

व्यसनाला या दूर पळवूया ||

  • व्यसनमुक्ती सोहळा :मित्र ग्रुपच्या सदस्यांपैकी जे सदस्य व्यसनमुक्तीचे एक किंवा अधिक वर्ष पूर्ण करतात अशा मित्रांचा व त्यांच्या कुटुंबियांचा एक सत्कार सोहळा प्रतिष्ठीत व्यक्तिच्या हस्ते मोठ्या प्रमाणात शांती नर्सिंग होम मध्ये होतो. हा सोहळा जागतिक आरोग्य दिनाचे (७ एप्रिल) औचित्य साधून साजरा केला जातो.  व्यसन हा शारीरिक, मानसिक तेवढाच सामाजिक प्रश्न पण आहे. त्याची जाण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा हेतू.

दारू पिणे या मानसिक आजार असलेल्या रुग्णांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्व बाजूंनी विचार करून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार केला जातो.