स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला नियमित आणि नेहमीच इलाजाची आवश्यकता असते. तसेच या आजारामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात बरेच मानसिक, सामाजिक, आर्थिक तसेच नोकरी किंवा व्यवसाय संबंधी प्रश्न निर्माण होतात आणि या सर्व अडचणींना सामोरे जातांना कुटुंबातील रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींवर खुप तणाव असतो. या तणावाचे व्यवस्थापन आवश्यक असते. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या काळजी वाहकांच्या तणावाचे व्यवस्थापन आणि त्यांच्या प्रश्नाची उकल नियमित होणे गरजेचे ठरते.

हे मनात ठेऊन १९९९ साली स्किझोफ्रेनिया आजार असलेल्या रुग्णांच्या काळजीवाहकांची मिटींग दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ठरवण्यात आली. हळूहळू काळजीवाहकांची उपस्थिती लक्षणियरित्या वाढत गेली. या सत्रांमध्ये काळजीवाहक त्यांच्या अनुभवांची देवाण घेवाण करत असत. त्यातून त्यांना मानसिक आधार, सकारात्मक दृष्टीकोन, ‘आपण एकटे नाही तर अजून अनेकजण आपल्या सोबत आहेत’ ही जाणीव निर्माण झाली.

अशा अनेक भेटीनंतर अधिक परिणामकारकरित्या काम करण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टतर्फे रुग्णाच्या कल्याणाकरिता संघटीत व नियोजित कार्य करण्याचे ठरविण्यात आले. या उद्देशाने स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान (रजिस्टर नंबर : Mah 274/03 dt. 27/03/03, F/9092/Au dt. 20/06/03) ही संस्था २७ मार्च २००३ रोजी रजिस्टर करण्यात आली.

या संस्थेची ध्येय व उद्दिष्टे ही सुस्पष्ट व निश्चित होती.

१. रुग्णांचे समुपदेशन करणे.

२. रुग्णाला सांभाळणाऱ्या नातेवाईकांचे प्रशिक्षण व समुपदेशन करणे.

३. काळजीवाहकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करणे.

४. मानसिक आजारांविषयी जनजागृती करण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र व कार्यक्रमांचे आयोजन करणे.

५. मनोसामाजिक शिक्षणासाठी दृकश्राव्य कार्यक्रम तयार करणे.

६. रुग्ण व काळजीवाहक यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने  आयोजित करणे.

७. रुग्णांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

८. जनजागृती करण्याकरिता प्रसार माध्यमांचा वापर करून घेणे.

९. रुग्णाला मार्गदर्शन मिळावे म्हणून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात्रील संस्थांशी संपर्क साधणे.

प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून घेण्यात आलेले उपक्रम :

१. वेगवेगळ्या प्रसिद्ध मानसोपचारतज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत.

२. प्रसिद्ध मनोचिकीत्सकांची व्याख्याने आयोजित केली आहेत.

३. मानसिक आजारांशी संबधीत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

४. मानसिक आजारांवर आधारित सिनेमे दाखविण्यात आले आहेत.

५.  संस्थेतील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळेसाठी पाठविण्यात आले आहे.

६. दरवर्षी स्किझोफ्रेनिया डे हा वेगळ्या वैशिष्ठ्य पद्धतीने रुग्ण व काळजी वाहकांसोबत साजरा केला जातो.

७. आजारातील स्थिर रुग्णाला त्याच्या पायावर उभे राहण्याकरिता व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.

इतक्या वर्षांमध्ये असंख्य काळजीवाहकांनी एकत्रित येऊन या त्रासदायक आजाराचा सामना केलाय. त्यांच्या रुग्णांना आधार दिलाय. ते रुग्ण बऱ्यापैकी स्थिर आहेत. हे स्वप्न घेऊनच या प्रतिष्ठानची स्थापना झाली होती.

आता ही मिटींग दर महिन्याच्या चौथ्या रविवारी, दुपारी १२ वाजता, शांती नर्सिंग होम येथील लेक्चर हॉलमध्ये  घेण्यात येते.