माईंड ट्रेनिंग सेंटर या विभागात मानसिक आजाराचा उपचार मानसोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून केला जातो. या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या उपचारपद्धतीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकारात विभाजन करता येईल.

१. वर्तणूक उपचार (Behavior Therapy)

२. समुपदेशन (Counseling)

३. मानसोपचार (Psycho Therapy)

या उपचारांची माहिती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.

१. वर्तणूक उपचार (Behavior Therapy):

“मानसशास्त्र हे मनाचे नाही तर वर्तणुकीचे शास्त्र आहे”, असे म्हणणारे शास्त्रज्ञ म्हणजे बिहेविअर थेरपीस्ट. आपण वागायला कसे शिकतो? आपली वर्तणूक कशी घडते किंवा बिघडते? शास्त्रज्ञांच्या मते या मागील तत्व म्हणजे कंडिशनिंग. (Behavior is conditioned response). ‘सामान्य असो की अपसामान्य माणसाची वर्तणूक शिकण्यातून घडते (Principles of learning)’ या तत्वावर आधारित उपचार पद्धतीस वर्तणूक उपचार पद्धत (Behavior Therapy) असे म्हणतात.

ही उपचार पद्धत म्हणजे एक प्रकारचे ट्रेनिंग असते. ही पद्धत फोबिया (भयगंड), ऑब्सेसिव कम्पलसिव्ह डिसोऑर्डर (विचार आणि कृती परत परत करण्याचा मानसिक आजार) या व इतर अनेक आजारात आमच्या या माईंड ट्रेनिंग सेंटरमध्ये आवश्यकतेनुसार वापरतात.

वर्तणूक उपचारांत मानवी विचार व भावनांचे महत्व ध्यानात घेऊन ज्या उपचार पद्धतीचा वापर होतो त्यास राशनल ईमोटिव थेरपी (अल्बर्ट एलिस) आणि कॉगनिटिव बिहेविअर थेरपी (अरॉन बेक) असे म्हणतात.

आपल्या वर्तणूकीच्या (प्रतिक्रिया) मागे घटनांची एक साखळी असते ती अशी

बाह्य घटना – विचार – भावना – प्रतिक्रिया

या साखळीतील विचार आणि भावना बदलल्या की वर्तणूक बदलते. या दोन कड्या बदलण्याचे नियम अरॉन बेक याने शोधून काढले. या कॉगनिटिव बिहेविअर थेरपीचा उपयोग उदासपणाचा मानसिक आजार, चिंता रोग आणि इतर मानसिक आजारात होतो.

जगभरात मान्यता पावलेल्या या उपचार पद्धतीचा उपयोग येथील माइंड ट्रेनिंग सेंटर मध्ये होतो.

२. समुपदेशन (Counseling)

समुपदेशन म्हणजे सल्ला देणे होय. समुपदेशन (Counseling) या शब्दाचा हा शब्दकोषातील अर्थ आहे. परंतु येथे या शब्दाचे स्वरूप जरा व्यापक आहे. समुपदेशन करतांना व्यक्तीच्या भावभावना, त्याचे संस्कार, प्रश्नाचे स्वरूप हे सर्व लक्षात घेतले जाते. भावनिक आधार देऊन परिस्थितीतून मार्ग काढण्याचे पर्याय सुचविले जातात.

समुपदेशनाची गरज कोठे असते?

        1. ताणतणावात  (Distress)
        2. आजारपणात (Disease)
        3. अपंगत्वात (Disability)
        4. अडचणीत (Difficulties)
        5. व्याधीत (Disorder)

समान प्रश्न किंवा समान आजार असलेल्या एकापेक्षा अधिक व्यक्तींचे समुपदेशन ग्रुप मध्ये करता येते. त्यास गट चर्चा (Group Counseling) म्हणतात. याचे निश्चितच काही फायदे आहेत. तसेच एकट्या व्यक्तीचे देखील समुपदेशन करणे आवश्यक ठरते त्यास व्यक्तीगत समुपदेशन (Individual Counseling) असे म्हणतात. 

समुपदेशनात वेगवेगळ्या तत्वांचा व तत्वज्ञानाचा उपयोग होतो. उदा. : कार्ल रॉजर्सच्या तत्वानुसार माणसे ही मूलत: चांगली असतात. आपण आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण करण्यास समर्थ असतो आणि त्यास पाहिजे तसे वळणही देऊ शकतो हे समजले की माणूस त्याचे प्रश्न स्वत:च चांगल्या रितीने सोडवू शकतो. रॉजर्सच्या उपचार पद्धतीत व्यक्तीचा स्वतःत बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास वाढतो. या उपचारास क्लायंट सेंटर्ड कौन्सेलिंग असे म्हणतात.

अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारांचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव काऊन्सेलिंग देण्याच्या पद्धतीवर पडलेला दिसून येतो.

३. मानसोपचार (Psycho Therapy)

मानसिक आजाराची जाण असणारे व कौन्सेलिंग योग्यप्रकारे करणारे कौन्सेलर्स शांती नर्सिंग होम मध्ये माईंड ट्रेनिंग सेंटर विभागात आहेत.

  • सपोर्टिव्ह सायकोथेरपी (Supportive Psychotherapy):

या उपचार पद्धतीत रुग्णाच्या भावनांना मोकळी वाट मिळून त्यांना धीर देण्याचे काम होते. या किंवा इतरही सायकोथेरपीत रुग्णाला आठवड्यातून निदान एक वेळा चर्चेसाठी दवाखान्यात येणे आवश्यक असते. साधारण ३० ते ४० मिनिटे एका वेळेस चर्चेसाठी देण्यात येतात. रुग्णाला धीर देणे, हरवलेला स्वाभिमान व स्वप्रतिमा परत रुग्णाच्या मनात निर्माण करणे हे काम या उपचारामुळे होतेच. त्या बरोबर व्यक्तीचे स्वतःचे प्रश्न सोडवण्यास या उपचार पद्धतीमुळे मदत मिळते.

ताणतणाव व मानसिक आजारात या उपचाराची गरज असते.

  • इंटरपर्सनल सायकोथेरपी (Interpersonal Psychotherapy)

मनोविकृती होण्यात मानवी नाते आणि ऋणानुबंध महत्वाचे मानले जातात. आपल्या बऱ्याच समस्या व दु:ख हे नात्यातील तणावामुळे निर्माण होतात.

तणाव का निर्माण होतो?

        1. मतभेद
        2. नात्यातील भूमिकेत बदल झाल्यामुळे (नवीन नाते निर्माण झाल्यामुळे)
        3. नाते तुटल्यामुळे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यामुळे
        4. नाते टिकवण्यातील वैयक्तिक कौशल्याच्या कमतरतेमुळे

आणि मग नात्यातील या कारणाने झालेला बिघाड, मानसिक आजार निर्माण करतो, या उपचार पद्धतीमुळे नात्यातील समस्या सुधारण्यास मदत होते.

  • इनसाईट सायकोथेरपी (Insight Psychotherapy)

रुग्ण्याच्या मनातील संघर्ष, आशा, आकांक्षा या गोष्टी त्याच्या आजारास, चिंतेस, उदासपणास कारणीभूत असतात. थेरपिस्ट (उपचार करणारा) आपले कौशल्य वापरून त्या दडलेल्या संघर्षपूर्ण विचारांना रुग्णाच्या जाणिवेपर्यंत आणण्याचे काम करतो. जाणीवा निर्माण झाल्या की उणीवा कमी होतात. त्यात थेरपिस्टची मदत रुग्णामध्ये सुधार घडवून आणण्यास पुरेशी ठरते. या उपचारामार्फत रुग्णाला आत्मचिंतनास मदत मिळते.

बोलून बरे करणाऱ्या या आणि इतर पद्धतीत उपचाराचे माध्यम भाषा आहे. बहुसंख्य अशिक्षित अथवा कमी शिकलेल्या लोकांना या माध्यमाचा वापर करता येत नाही. यासाठी द्यावा लागणारा वेळ बरेच रुग्ण देऊ शकत नाहीत आणि काही वेळा मनोविकारतज्ञही त्यासाठी फारसा वेळ देऊ शकत नाहीत. पण ही उणीव शांती नर्सिंग होम मध्ये एक वेगळे डिपार्टमेंट काढून, त्यासाठी खास तज्ञांची नेमणूक करून भरून काढली आहे.

वरील सर्व गोष्टी माइंड ट्रेनिंग सेन्टरमध्ये सातत्याने सुरु आहेत.